Monday, January 22, 2018

मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?

मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?

नुकतीच मला Whatsapp गृपवर मध्यमवर्गातील व्यक्तीने कोणत्या साधनात व किती प्रमाणात गुंतणूक करावी असा प्रश्न विचारला गेला होता म्हणूनच हा ताजा लेख मी आजच लिहिला आहे तो आपणास कदाचित मार्गदर्शक होऊ शकेल.

सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय व्यक्ती हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या सुरक्षित साधनात गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देत असतो.  परंतु आजकाल बँक ठेवींवरील व्याजाचे दर हे ७% पर्यंत कमी झालेले असून जर भविष्यात महागाईचा दर नियंत्रणात राहिला तर RBI व्याजदर आणखी कमी करू शकेल. आपणास माहित असेलच कि मुख्यत्वेकरून आपल्या सारख्या Developing Country मध्ये दरवर्षीच महागाई वाढतच असते यामुळे रुपयाची किंमतही दरवर्षी कमी होत असते. बँकेकडून मिळणाऱ्या व्याजातून जर महागाईचा दर कमी केला तर खरे म्हणजे फक्त पैसे सुरक्षित ठेवण्याचे उद्दिष्टच फक्त यातून पुरे होऊ शकते. यामुळे बँकेत नियमित बचत किंवा ठेवी करून दीर्घ काळात संपत्ती निर्माण करता येत नाही हि वासुस्थिती आहे. यामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणुकीचे अन्य पर्याय शोधलेच पाहिजेत.

नियमित किंवा एकरकमी गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्याची ताकद हि शेअर बाजारात सर्वाधिक जास्त आहे हे सिद्ध झालेले त्रिकालाबाधित सत्य आहे, याचा अर्थ आपली सर्वच गुंतवणूक हि शेअरबाजारात किंवा म्युचुअल फंडात करावी असा होत नाही. आपली गुंतवणूक हि विविध साधनात विभागलेली असली पाहिजे कारण शेअरबाजारात कायम तेजी राहणार नाही आणि जर मंदीच्या काळात पैशाची गरज लागली तर नुकसानीत पैसे काढावे लागतील, म्हणून आपली गुंतवणूक विभागून ठेवावी. मात्र आपल्या गुंतवणुकीचा काही हिस्सा हा शेअरबाजारात गुंतवलेला असलाच पाहिजे.

कोणत्या साधनात किती प्रमाणात गुंतवणूक करावी यासाठी शास्त्र आहे परंतु हे व्यक्तीसापेक्ष बदलत राहते कारण प्रत्येक व्यक्तीची गुंतवणुकीची गरज वेगवेगळी असते, जोखीम स्वीकारण्याची क्षमता व तयारी वेगवेगळी असते. गुंतवणूक कोणत्या साधनात करावी याचा निर्णय करताना अनेक गोष्टी विचारात घ्याया लागतात, वय, मिळकत, मिळकत स्थिर आहे कि अस्थिर आहे, नोकरी का व्यवसाय, घरात किती व्यक्ती आहेत, त्यातील किती व्यक्ती मिळवत्या आहेत असल्यास त्यांचे उत्पन्न किती, किती व्यक्ती तुमच्यावर अवलंबून आहेत, किती काळासाठी गुंतवणूक करण्याची तयारी आहे, गुंतवणूक कोणत्या उद्देशाने करावयाची आहे, गुंतवणूक नियमितपणे करावयची आहे कि एकरकमी करावयाची आहे इ. अनेक गोष्टींचा विचार करूनच तुमचा चांगला व अनुभवी गुंतवणूक सल्लागार तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देत असतो. यामुळे सर्वांना एकाचप्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला मी देऊ शकत नाही मात्र, काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे.

गुंतवणुकीचे प्रमाण हे वयोमानानुसार बदलते असावे, यासाठी विविध प्रकारची गणितीय सूत्र अवलंबली जाते. मात्र समजण्यासाठी सोपे म्हणून १०० या संखेतून तुमचे वय वजा करता जी बाकी येईल तेवढ्या प्रमाणातील रक्कम हि दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअरबाजार व म्युचुअल फंडात गुंतवावी व हे प्रमाण दरवर्षी वयानुसार बदलते ठेवणे शक्य होत नाही म्हणून किमान दर ५ वर्षांनी तरी ते बदलत न्यावे.

१)   नियमितपणे किती गुंतवणूक करावी: सर्वसाधारणपणे भारतीय लोक त्यांच्या मासिकप्राप्तीच्या सरासरी ३५% रकमेची गुंतणूक करतो. हे प्रमाण योग्य आहे, मात्र व्यक्तीसापेक्ष ते बदलू शकते. २५ ते ३० वर्षाचे व्यक्तीने जेव्हा जबाबदारी नसते तेव्हा जास्त गुंतवणूक करावी व एकदा खर्च सुरु झाले कि ती कमी करून किमान ३५ ते ४०% एवढीतरी करावी.

२)    लिक्विड फंड: आकस्मिक खर्चाच्या तरतुदीसाठी या फंडात किमान आपल्या ६ महिन्याच्या उत्पन्नाएवढी रक्कम कायम ठेवावी. यात सरासरी आपल्या गुंतवणुकीच्या १०% रक्कम गुंतवत जावी.

३)    शेअर मार्केट: शेअरबाजारात जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर मध्यमवर्गीय नोकरदार माणसाने ते शक्यतो टाळावे कारण अभ्यास नसतो व वेळ नसतो. मात्र जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करू इच्छित असाल तर अवश्य करावी. यासाठी अशी एखादी चांगली कंपनी निवडावी कि जिचे कॅपिटल कमी आहे मात्र त्या कंपनीच्या उत्पादनाची सर्वत्र व जास्त प्रमाणात विक्री होते थोडक्यात ज्या कंपनीची उत्पादने सर्वात जास्त लोकं वापरतात. अशी कंपनी निवडल्यावर दर महिना किंवा दर तीन महिन्यांनी एका ठराविक तारखेला किमान एक तरी शेअर विकत घ्यावा. मात्र शेअर बाजार किंवा कमोडीटी बाजारात डे-ट्रेडिंग, फ्युचर्स/ऑप्शन्स या प्रकारापासून दूर रहानाण्याचा शकतो प्रयत्न करा. शेअरबाजारात आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी साधारण १५% रक्कम गुंतवावी.

४)    म्युचुअल फंड: म्युचुअल फंडात आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थान हे एक तज्ञ फंड व्यवस्थापक करत असतो ज्याला शेअरबाजाराचे चांगले ज्ञान ज्ञान असते तसेच सर्व साधनसामुग्रीही त्याचेजवळ उपलब्ध असते. म्हणून सर्वसामान्य माणसाने म्युचुअल फंडाच्या विविध योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. हि गुंतवणूक एसआयपी च्या माध्यमातून दीर्घकाळासाठी अगदी आपण निवृत्त होईपर्यंत करावी, मध्ये जर आवश्यकता भासली तर पैसे काढावेत.  म्युचुअल फंडामध्ये विविध प्रकारच्या योजना असतात तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणुकीसाठी योग्य योजनेची निवड करावी. याचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या ५०% एवढे तरी असावे.

५)     रिअल इस्टेट: स्वत:ला राहण्यासाठी जर घर हवे असेल ते घेतलेच पाहिजे मात्र गुंतणूक म्हणून दुसरे घर घेणे किंवा कोठेतरी जागा घेऊन ठेवणे त्यासाठी बँकेचे कर्ज काढणे या गोष्टी टाळलेल्याच चांगल्या कारण एकतर स्थावर मालमत्ता विकत घेताना त्याला चांगला दर द्यावा लागतो पण विकताना तो मिळेलच याची खात्री नसते, या व्यवहारात पारदर्शकता कमी असते. अल्प काळात यातून कधीतरी जास्त परतावा मिळू शकतो मात्र दीर्घ काळात मिळणारा परतावा हा शेअरबाजारापेक्षा कितीतरी प्रमाणात कमी असतो. स्वत:साठी  गृहकर्ज घेऊन घर घेत असाल तर जेव्हढा इएमआय असेल त्याच्या १०% रकमेएव्हढ्या रकमेची एसआयपी म्युचुअल फंडात अवश्य करावी जेव्हा तुमचे गृहकर्ज फेडून होईल तेव्ह्या तुम्ही बँकेत भरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळू शकेल. यामुळे स्थावर मालमत्तेत किती प्रमाणात गुंतवणूक करावी याचे प्रमाण देता येत नाही. इएमआय कधीही आपल्या मासिक उत्पनाच्या ३०% ते ४०% पेक्षा जास्त नसावा.

६)       बॉंड/पोस्ट/बँक ठेवी या प्रकारात १५% ते २०% रक्कम गुंतवावी जी केव्हाही उपयोगी येऊ शकेल.

७)       सोने: उर्वरित ५% रक्कम सोन्यात गुंतवावी.  खरे पाहता सोन्यातील गुंतवणूक हि भावनिक असते मात्र यातून जास्त लाभ मिळत नसतो.

८)       जीवन विमा: मृत्यू कुणाला केव्हा येईल हे माहित नसते म्हणून प्रत्येकानेच आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रथम विमा घ्यावा. बाकी विम्याचे कोणतेही प्लान घेऊ नयते. २५/३० वर्षाचे व्यक्तीला वार्षिक रु.६ ते ७००० रुपयांच्या वार्षिक हप्त्यात सुमारे रु.१ कोटीची विमा कवच मिळू शकते.

९)      मेडिक्लेम: प्रत्येकाने आपल्या कुतुबातील सर्व व्यक्तींचा समावेश असणारी मेडिक्लेम पोलिसी अवश्य घ्यावी कारण आपल्या घरातील कोणालाही कधीही आजार येऊ शकतो हे लक्षात ठेवा त्याची तरतूद केली तर आर्थिक भर जाणवणार नाही.

याचप्रमाणे आपले सारे असेटस विमा कवच घेऊन सुरक्षित करणे शहाणपणाचे असते. तसेच आपल्या गुंतवणुकीला वारस हा नेमलाच पाहिजे ज्यामुळे भविष्यात काही अघटीत घडले तर वारसाला त्रास होत नाही. याचप्रमाणे एकदा का आपले असेटस निर्माण झाले कि प्रत्येकाने इच्छापत्र तयार करून ठेवावे.

जर पती-पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यांचे दोघांचे उत्पन्नाचा ताळमेळ घालून दोघांचीही वेगवेगळी गुंतवणूक करावी.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर अन्यत्र शेअर करण्यास हरकत नाही, मात्र माझ्या नावासहित शेअर करावे हि विनंती.

Sadanand Thakur
Individual Financial Advisor,
Thakur Financial Services
275, Manisha, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun-415605
Tel: (02355) 251089 Mobile: 9422430302 and 9518752605

Sunday, November 19, 2017

प्रकरण ७ वे - निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?

प्रकरण ७ वे 

७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?
कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी त्या कंपनीच्या संबधीत विवीध रेशो पहाणे गरजेचे असते.  विवीध रेशोंचे विश्लेषण करताना त्या कंपनीची एकंदर कामगिरीचे मोजमाप करता येते व सर्वच रेशो जर गणितीदृष्ट्या योग्य असतील तर गुंतवणूक करताना आपली खात्री होते कि आपला गुंतवणूकीचा निर्णय योग्य असून आपण त्या शेअरच्या किंमतीत होणा-या चढ उतारामुळे आपले मन विचलीत होत नाही व चुकीच्या वेळी शेअर खरेदी अथवा विक्रीचा निर्णय आपण घेत नाही. उलट अशा शेअरची किंमत जर कमी झाली तर ती एक चांगली संधी समजून आपण त्या शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करतो व तेजीच्या काळात जास्त फायदा मिळवतो. दुसरा फायदा म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक हि दिर्घ मुदतीसाठीच जास्तकरुन फायदेशीर होते हे आपणास कळते व तसे आपण निर्णय घेतो.  

पीएसआर (प्राइज टू सेल्स रेशो): 
हा रेशो ३ पेक्षा कमी असलाच पाहिजे, खरं म्हणजे तो १ पेक्षाही कमी असेल तर चांगले. याच्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत व प्रती शेअर विक्री यांची तुलना करता येते. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे कि जर का पीएसआर ३ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नुकसान होण्याचीच शक्यता (खात्रीच म्हणाना) जास्त असते व जर हा रेशो १ पेक्षा कमी असेल तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते.

पीएसआर = शेअरची किंमत / प्रती शेअर मिळणारे मागील १२ महिन्याचे विक्रीचे उत्पन्न
उदा.: क्ष लि. ची गेल्या १२ महिन्यातील एकूण विक्री = रु.१०० कोटी
कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या १ कोटी
म्हणून प्रती शेअर विक्रीचे उत्पन्न रु.१००
कंपनीच्या शेअरचे बाजार मुल्य रु.७५ प्रती शेअर
पीएसआर = ७५/१००
= ०.७५

रिटर्न ऑन इक्वीटी: 
याचा अर्थ तुमच्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो, वॉरेन बफेट म्हणतो जर का तुम्हाला २०% च्या दरम्याने मिळत असेल तर तो चांगला समजावा.
Return on Equity = Net Income/Shareholder's Equity

डेब्ट इक्वीटी रेशो: 
हा रेशो कंपनीच्या स्वत:च्या भांडवलाशी कर्जाचे प्रमाण दाखवतो. कंपनीचे एकूण कर्ज / कंपनीचे एकूण शेअर भांडवल या सुत्राने हा काढला जातो. हा किमान ०.५ पेक्षा तरी कमी असणे उत्तम, परंतु १ असला तरी चालू शकते. मात्र जर का तो २ पेक्षा जास्त असेल तर धोक्याची घंटा समजावी. याचा अर्थ कंपनीला जास्त प्रमाणात कर्जावर व्याज द्यावे लागेल व त्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफा मिळवण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होईल. म्हणून सगळेच कर्ज वाइट असते असे नव्हे जर का कर्जावरील व्याजाची फेड करुनही जर का कंपनीचा फायदा चांगल्या प्रमाणात होत असेल तर कंपनी कर्जाचा उपयोग विस्तारीकरणावर किंवा उलाढाल वाढीसाठी प्रभावीपणे करत आहे असे समजले जाते. मात्र पायाभूत सुवीधा पुरवणा-या कंपन्यांचे बाबत हा रेशो वापरणे योग्य नसते कारण त्यांची उभारणीच मुळी उच्च डेब्ट इक्वीटी रेशोवर केलेली असते कारण त्याना लागणारे भांडवलाचे प्रमाणच जास्त असते.

बेटा:
इंडेक्सच्या तुलनेत शेअरची किंमत किती अस्थीर आहे हे बेटा फँक्टरमुळे कळू शकते. जेवढा बेटा जास्त तेवढे शेअरच्या किंमतीत जास्त चढ-उतार संभवतात. तर जर बेटा उणे असेल तर समजावे कि तो बाजाराच्या कलाविरुध्द वाढ घट दाखवेल म्हणजेच जेव्हा बाजारात तेजी असेल तेव्हा अशा शेअरची किंमत मात्र कमी होते व बाजार खाली जात असताना याची किंमत वाढते. ह्याची गणना करणे हे फारच किचकट असल्यामुळे मी याचे सुत्र येथे देत नाही मात्र तो बीएसईच्या साईटवर रोजच्या रोज उपलब्ध असतो,
http://www.bseindia.com/indices/betavalues.aspx या संकेतस्थळावर तुम्हाला कंपनीचा बेटा पाहाता येईल.

प्रतीशेअर उत्पन्न (Earning per share – EPS)
याच्यामुळे कंपनी प्रतीशेअर किती उत्पन्न मिळवते हे समजून येते आणि गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मिळणारे प्रती शेअर उत्पन्न हेच जास्त महत्वाचे असते. इपीएस = कंपनीचा निव्वळ नफा / कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या या सुत्राने इपीएस काढला जातो. उदा. क्ष लि. चे २ कोटी शेअर्स आहेत व नफा जर रु.६ कोटी असेल तर इपीएस होईल रु.३ प्रती शेअर. याच्यामुळे कंपनी अल्पकाळात व दिर्घ काळात कशी ग्रोथ (वृध्दी) त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत करते हे समजून येते. म्हणून गुंतवणूक करण्यापुर्वी त्या सेक्टरमधील सर्व कंपन्याचा इपीएसची तुलना करणे अत्यावश्यक आहे.

पी / इ रेशो 
कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना फक्त इपीएस पाहून चालत नाही तर त्याच बरोबर त्याची तुलना शेअरच्या बाजारभावाशी करणेसुध्दा अत्यावश्यक असते. यासाठी पी ई रेशो पहाणे महत्वाचे असते. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना पी / ई रेशो हा महत्वाचा घटक असल्यामुळे आपण याची येथे जरा विस्ताराने व उदाहरणासह चर्चा करुया. पी / ई रेशो = शेअरचे बाजार मुल्य (किंमत) / गेल्या ४ तिमाहितील इपीएस उदा. क्ष लि. च्या शेअरचे बाजारमुल्य आहे रु.१०० आणि त्याचा इपीएस आहे रु.२० प्रती शेअर तर त्या शेअरचा पी ई होतो ५. कंपनीच्या इपीएस मध्ये नियमीतपणे जर मोठ्या प्रमाणावर वाढ होत असेल त्या शेअरची किंमतही वाढण्याचे ते एक महत्वाचे कारण होते. जर का त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत एखाद्या कंपनीच्या शेअरचा पी ई रेशो जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तो स्टॉक महाग असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. तेच जर पी ई कमी असेल तर तो शेअर गुंतवणूकीसाठी योग्य आहे असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. मात्र मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर ज्या शेअरचा पी ई रेशो जास्त आहे अशा शेअरची कामगिरी जास्त चांगली झालेली दिसून आलेली आहे. क्ष ह्या कंपनीचे सध्याचे प्रती शेअर उत्पन्न रु.१ असून त्या कंपनीची अपेक्षा आहे कि हे उत्पन्न भविष्यात वार्षीक २०% दराने वाढेल हे गृहित धरल्यास ५ वर्षानंतर कंपनीचे प्रती शेअर उत्पन्न असेल रु.२.५०. आता असे धरुया कि या क्षेत्रानुसार कंपनीचा पी / ई रेशो १५ हा गुंतवणूकदाराचे दृष्टीने योन्य आहे. म्हणून हा शेअर अपेक्षीत २.५० च्या इपीएस नुसार १५ पटीने विकला जाईल (२.५० गुणीले १५) म्हणजेच रु.३७.५० या किंमतीला विकला जाईल तो होतो चालू वर्षाच्या इपीएसच्या ३७.५० पट. येथे कंपनी २०% वार्षीक दराने उत्पन्नात वाढ अपेक्षीत असल्यामुळे (व या कंपनीची मागिल कामगिरीही सतत चांगली राहिलेली असल्यामुळे) गुंतवणूकदार हा शेअर भविष्यात मिळणा-या उत्पन्नावर अवलंबून जास्त किंमतीला तो शेअर खरेदी करण्यास तयार असतो. अशा वेळी तो शेअर उच्च पी / ई (या वर्षीच्या तुलनेत) असूनही खरेदी केला जातो. याचाच दुसरा अर्थ चांगल्या व्यवस्थानाखालील, चांगल्या कामगिरीचा इतिहास असलेल्या व भविष्यात आकर्षक उत्पन्न देऊ शकणा-या म्हणजेच थोडक्यात गुंतवणूकदारांच्या दृष्टीने चांगल्या (वेलनोन) कंपनीच्या शेअरला तो जास्त किंमत मोजण्यास तयार असतो.

रेशोंचे विश्लेषण आजकाल इंटरनेटवर अनेक साईटसवर उपलब्ध असते, प्रामुख्याने काही चांगल्या ब्रोकरच्या साईटवर, बीएसई व एनएसीच्या साईटवरही हे उपलब्ध असते या सुवीधेचा वापर शेअर बाजारात गुंतवणूक करु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.

मात्र जर तुमच्याकडे अजिबात वेळच नसेल व हे काम तुमच्यावतीने तज्ञ व्यक्तीने करुन तुम्हाला दिर्घ मुदतीत शेअर बाजारापासून मिळणार फायदा मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एखाद्या चांगल्या वेग वेगळ्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाणा-या म्हणजेच डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत नियमीत दर महा एसआयपीच्या माध्यमातून दिर्घ मुदतीसाठी (साधारण ५ वर्षापेक्षा जास्त व उत्तम परताव्यासाठी १५ ते २० वर्षे) करणे हे अतिशय फायदेशीर होते. अशाप्रकारच्या चांगल्या योजनानी सरासरी वार्षीक २५% चक्रवाढ दराने १५ पेक्षा अधीक वर्षाचे काळात उत्पन्न दिलेले आहे. आणि अजून किमान ३० ते ४० वर्षे ते याच दराने मिळण्याची शक्यता आहे.

रेशोंप्रमाणेचे कंपनीच्या फंडामेंटलचे विश्लेषण करणेही तेवढेच किंबहुना अधीक महत्वाचे आहे त्याबाबत आपण पुढील प्रकरणात चर्चा करुया.


Sunday, November 5, 2017

६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?

प्रकरण ६ वे
६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?
सर्वसामान्य माणूस शेअर बाजारातील तज्ञ होऊ शकतो काय?

होय, निश्र्चितच होऊ शकतो.
लोकांचा मात्र असा समज असतो कि सध्याच्या अस्थीर बाजारात काय आपला निभाव लागणे शक्य नाही. तसाच दुसरा असा समज आहे कि हे काम फक्त तज्ञ व्यक्तीच करु शकतात, माझे ते काम नव्हे, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हि गोष्ट खरीच आहे, अशावेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हेच तुमच्यासाठी योग्य होईल कारण तज्ञ फंड मँनेजर तुमच्यावतीने तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करत असतो, मात्र त्याच्यावर काही बंधने असतात, त्यातील महत्वाचे म्हणजे योजनेच्या उदिष्ठांनुसारच त्याला गुंतवणूक व्यवस्थापन करावे लागते, म्हणूनच म्युच्युअल फंडाची योजना निवडताना तिचे उदिष्ठ व मागील कामगीरी तपासून पहा. यासाठी चांगल्या म्युच्युअल फंड वितरकाची मदत घ्या.

मात्र जर तुम्ही स्वत: तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यास वेळ देऊ शकत असाल तर तुम्हीच तज्ञाप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. तुम्ही हे निश्र्चितच करु शकता. त्यासाठी ह्या लेखातील व या पुढे मी देत असलेले लेख काळजीपुर्वक वाचा व त्याचा उपयोग तुमच्या गुंतवणूक व्यवस्थापनासाठी करा. प्रथमत: तुम्ही ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करु इच्छित आहात त्याची माहिती नीट होण्यासाठी खालील बाबी कशा तपासाव्या हे मी तुम्हाला प्रथम सांगतो.

विक्रीतील वाढ
कंपनीची विक्रीत दर वर्षी होणारी वाढ हा एक महत्वाचा घटक आहे. मागील वर्षापेक्षा किती टक्के विक्री वाढली आहे हे तपासा. नियमीत वाढ हे कंपनीच्या चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण आहे. जर विक्रीत घट झाली असेल तर त्याचे कारण तपासा, हा बदल तात्पुरता आहे कि दिर्घकाळ परिणाम करणारा आहे याची माहीती घ्या. विक्रीत होणा-या वाढीचा दर हा प्रत्येक सेक्टरसाठी वेगवेगळा असू शकतो उदा. एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्याच्या विक्रीची वाढ हि १०% दराने साधारणपणे होत असल्यास चांगली समजली जाते तर आयटी कंपनीची वाढ हि २०% पेक्षा जास्त असणे चांगले समजले जाते. हा निकष प्रत्येक सेक्टरसाठी वेग-वेगळा असतो. विक्रीच्या वाढ/घटीचा परिणाम शेअर्सच्या किंमती कमी/जास्त होण्याशी असतो. अपवाद बाजारातील तात्तपुर्ती तेजी/मंदी. नेहमी विक्रीत वाढ होणारी कंपनी तुम्हाला दिर्घकाळात तुमच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा देऊ शकते. मात्र विक्रीतील वाढ एवढा एकच निकष पुरेसा नाही अन्य गोष्टी सुध्दा तेवढ्याच महत्वाच्या असतात. त्या आता एक एक करुन पाहुया.

बॉटम लाईन ग्रोथ
बॉटम लाईन ग्रोथ म्हणजेच कंपनीच्या निव्वळ (नेट) नफ्यात होणारी वाढ. निव्वळ नफ्यात नियमीतपणे होणारी वाढ कंपनीची प्रगती दाखवते व याचा परिणाम शेअर्सच्या किंमतीत वाढ होण्यात होतो. नफ्यातील वाढ हिसुध्दा सेक्टरनुसार वेगवेगळी असते. उदा. आयटी सेक्टरमधील चांगल्या कंपनीच्या नफ्यातील वाढ हि गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ ते ७०% असू शकते तर एफएमसीजी व जुन्या कंपन्यांच्या बाबत हि वाढ १० ते १५% सुध्दा चांगली मानली जाते.

आरओआय रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट अर्थात गुंतवणूकीवरील परतावा:
म्हणजेच कंपनीने गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात किती परतावा मिळाला हे पहाणे. जर का एखाद्या कंपनीने रु.१०० कोटी मशिनरी, जमीन, मनुष्यबळ व अन्यत्र भांडवली गुंतवणूक केलेली असेल व जर त्या कंपनीला निव्वळ नफा रु.२५ कोटी वर्षात झालेला असेल तर आरओआय होईल २५%. परत आरओआय हा सुध्दा कंपनीच्या प्रकारावर पाहिला पाहिजे. आयटीसाठी तो ३५ ते ४० टक्के चांगला असेल तर भांडवली पीएसयुसाठी तो १० ते १५% चांगला समजला जातो.

व्हॉल्युम (उलाढाल):
काही तज्ञ कंपनीच्या शेअर्सच्या बाजारातील होणा-या रोजच्या रोजच्या व वर्षातील दररोजच्या सरासरी उलाढालीला महत्व देतात. यामुळे असे कळते कि त्या कंपनीच्या शेअर्सची रोज खरेदी विक्री किती संखेत होते. जर कंपनीच्या संबंधी एखादी महत्वाची बातमी बाजारात येते तेव्हा अचानकपणे त्या कंपनीच्या शेअर्सची उलाढाल वाढते कारण मागणी एकतर चांगली बातमी असली तर वाढते व वाईट बातमी असेल तर मागणी कमी होते व याचा परिणाम शेअरच्या किंमतीत होणा-या वाढ-घटीवर होतो. शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या संखेने हेही समजते कि त्या शेअरची तरलता किती आहे. ज्या शेअरची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असे शेअर विकणेही सुलभ असते (कारण गि-हाईक समोर असते) तसेच यांच्या खरेदीवर होणारा खर्चही अल्प असतो. याच्या उलट ज्या शेअर्सची कमी किंवा क्वचीतच उलाढाल होते अशा शेअर्सच्या किंमतीत होणारा बदलही मोठा असतो म्हणून अश्या शेअर्सच्या शक्यतो वाटेलाच जाऊ नये. उलाढालीमुळे शेअर्सच्या मागणी व पुरवठ्याचीसुध्दा कल्पना येते ज्यामुळे किंमत कमी होणार आहे कि वाढणार आहे याचा प्राथमीक अंदाज येतो. जेव्हा अचानकपणे एखाद्या शेअरची किंमत वाढू लागली कि त्याचे कारण तपासले पाहिजे, एक कारण असे असू शकते कि कोणतातरी संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअर्सची खरेदी करु लागला असेल. तसेच किंमत कमी होण्याचे कारण याच्या उलट असते, तेव्हा संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री करत असतात.

मार्केट कँपिटलाझेशन (भांडवली बाजार मुल्य)
कंपनीच्या सर्व मिळून शेअर्सचे होणारे त्या वेळचे बाजार मुल्य (एकूण शेअर्स गुणीले प्रती शेअरचा दर). यामुळे कंपनी मोठी, मध्यम कि लहान आहे हे कळते. तसेच त्या शेअरची तरलतासुध्दा यामुळे अजमावता येते, जेवढे भांडवली बाजार मुल्य जास्त तेवढी तरलता जास्त असण्याची शक्यता असते. आपल्याला जर नियमीत व स्थिर परतावे मिळावे असे वाटत असेल म्हणजेचे तुलनेत कमी जोखीम स्विकारावयाची असेल तर ज्या कंपनीचे भांडवली बाजार मुल्य सर्वात जास्त आहे अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, जर मध्यम जोखीम घ्यावयाची असेल तर मध्यम आकाराच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत व जर जास्तच जोखीम घ्याव्याची असेल तर लहान कंपन्याचे शेअर्स घ्यावेत. म्हणजेच भांडवली बाजारमुल्य आपणास शेअर खरेदी करताना आपली जोखीम ठरविण्यास मदत करते.

कंपनी व्यवस्थापन
खरे पहाता कंपनीचे व्यवस्थापन कोणत्या व्यक्तींच्या किंवा समुहाच्या हाती आहे हे पहाणे सर्वात महत्वाचे असते. यामुळे या व्यवस्थापनाच्या अन्य कंपन्या असल्यास त्यांची कामगिरी तुलनेसाठी फारच उपयुक्त ठरते. कंपनीचे व्यवहार किती पारदर्शक आहेत हे त्या कंपनीच्या व्यवस्थापनावरुनच समजते. त्यांची कंपनीकडे पहाण्याची दृष्टी कशी आहे हेही फार महत्वाचे असते. म्हणूनच टाटा, बिर्ला, या समुहाला सर्वमान्यता जास्त असते. कंपनी कशी चालवावी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्री. नारायण मुर्ती यानी चालवलेली इन्फोसीस हि कंपनी व व्यवस्थापन कसे नसावे याचे उदा. सत्यम कंपनी (आता ती महिंद्र गृपने घेतल्याने जुन्या भागधारकाना दिलासा मिळाला हि गोष्ट वेगळी). कंपनी कामगिरी कशी करणार हे पुर्णत: व्यवस्थापनावरच अवलंबून असते. जर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणा-या व्यक्ती या कार्यकुशल, प्रामाणिक व विश्वासार्ह असतील व ते जर अन्य चांगल्या कार्यरत असणा-या कंपनीच्या व्यवस्थापनेचा भाग असतील तर अशा कंपनीला मोठे गुंतवणूकदार नेहमीच प्राधान्य देत असतात. तसेच कंपनीचा एमडी कोण आहे हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असते. यामुळेच आपण शेअर्स खरेदी करताना व्यवस्थापन कोणाचे आहे याला प्राधान्य दिले पाहिजे.

आता पुढील प्रकरणात आपण महत्वाचे रेशो कसे पहावेत याची माहिती घेऊ.


Monday, October 30, 2017

५. तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा

प्रकरण ५ वे
५. तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा

गुंतवणूकीचे उदिष्ठ
ज्या गुंतवणूकीमधून दिर्घ मुदतीत चांगला परतवा मिळेल अशा गुंतवणूकीच्या साधनाची निवड अत्यंत काळजीपुर्वक केली पाहिजे. अल्प काळाचा विचार गुंतवणूक करताना करणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. मुख्यत्वेकरुन जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तेव्हा तुम्ही दिर्घ काळाचाच विचार करणे तुमच्या हिताचे होईल. शेअर बाजारात नेहमीच शेअर्सच्या किंमती अत्यंत वेगाने वर खाली होत असतात. सुरुवात करताना किमान ३ ते ५ वर्षाचे उदिष्ठ ठेऊन गुंतवणूकीची सुरुवात करा. त्यासाठी प्रथमत: तुम्ही स्वत:लाच ओळखण्यास सुरुवात करा.

तुम्ही तुमच्या गुंतवणूकीपासून काय मिळवू इच्छित आहात?
नियमीत उत्पन्न, मुद्दलात वाढ कि दोन्ही गोष्टी मिळवू इच्छीत आहात हे ठरवा.

आता तुम्ही किती जोखीम स्विकारण्यासाठी तयार आहात?
प्रत्येकाची जोखीम स्विकारण्याची मानसीकता सारखी असू शकत नाही त्यामुळे काही व्यक्ती बाजारात गुंतवणूक केल्यानंतर जर नुकसान झाले तर लगेच शेअर्स विकून बाजाराला राम राम करतात, यामध्ये अनैसर्गीक असे काहीच नाही. मात्र अशी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाने शेअरबाजारात गुंतवणूक न करणेच इष्ट असते. कोणत्याही व्यवसायात नफा व नुकसान हे होतच असतेच. जेथे जास्त फायदा मिळण्याची शक्यता असते तेथे नुकसानही जास्तच होऊ शकते. शेअर बाजाराचा दोनशे वर्षाचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येते कि अनेकवेळा शेअर बाजार ६०% पेक्षा जास्त कोसळलेला आहे हि जशी वस्तुस्थीती आहे त्याचप्रमाणे ज्यानी ज्यानी चांगल्या कंपन्याच्या शेअर्समध्ये दिर्घकाळासाठी गुंतवणूक केली आहे त्या सर्वानाच अतिशय उत्तम फायदा झालेला आहे. म्हणूनच शेअर बाजारात तुम्हाला उतरावयाचे असेल तर तुम्ही दिर्घकाळासाठीच गुंतवणूक करणे व ती नियमीतपणे करणे हेच अंतीमत: योग्य ठरु शकते. तुम्हाला माहित असेलच कि बेंजामीन ग्राहम व वॉरेन बफेट सारख्या यशस्वी गुंतवणूकदारानी शेअर बाजारातून अमाप उत्पन्न मिळवले पण त्यानी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये बदल झाला तरच त्यांची त्या कंपनीतील गुंतवणूक काढून त्यांच्या पोर्टफोलीओमध्ये बदल केलेला आहे. जर का तुम्हाला एकदा हे समजले कि आपल्याला आपल्या गुंतवणूकीपासून किती फायदा होऊ शकतो तरच काही तासात, दिवसात, आठवड्यात, माहिन्यात किंवा अगदी २ ते ३ वर्षातसुध्दा तुम्ही घेतलेल्या शेअरची किंमत कमी अथवा जास्त झाली तरी तुम्ही विचलीत होणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरुवात करताना म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेपासून सुरुवात करणे केव्हाही चांगले असते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन तज्ञ व्यक्तींव्दारे केले जाण्याची सुवीधा मिळते. जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला दिसून येईल कि म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनानी गेल्या २५ वर्षात वार्षीक सरासरी १५% ते ३०% परतावा तोही चक्रवाढ पध्दतीने दिलेला आहे. परत यात आपल्याला काही व्यवस्थापन करावे लागत नाही. तुमचा गुंतवणूक सल्लागार यासाठी म्युच्युअल फंडाची चांगली योजना निवडण्यास मदत करत असतो. मात्र जर का बाजारातील चढ-उतार, अस्थीरता या गोष्टींचे तुम्हाला वावडे असेल तर तुम्ही निश्र्चित उत्पन्न साधनात गुंतवणूक करणेच योग्य होईल.

आर्थीक नियोजन व उदिष्ठ ठरवीणे:
गुंतवणूकीसाठी शिस्तबध्द नियोजन व कोणत्या उदिष्ठपुर्तीसाठी गुंतवणूक करावयाची या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. यासाठी प्रथमत: तुम्ही तुम्हालाच काही प्रश्र्न विचारा:
मी कीती काळ नियमीत गंतवणूक करु शकतो? याचा अर्थ तुम्ही गुंतवणूकीची सुरुवात करत असताना तुमचे सध्याचे वय काय आहे व तुम्ही तुमच्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत नियमीत गुंतवणूक करु शकता या मधील काळ हा तुमचा गुंतवणूकीचा काळ असतो. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करत अहात हेही महत्वाचेच आहे. कारण काहीही असू शकते जसे कि घर/गाडी घेणे, गृह कर्ज घेताना स्वत:चा हिस्सा निर्माण करणे, दुसरे घर/प्रॉपर्टी घेणे, मुलांचे शिक्षण/लग्न, मोठ्या ट्रिपला जाणे, निवृत्तीनंतरची सोय इ. याचबरोबर अल्प मुदतीत आपली कोणती आर्थीक गरज भागवावी लागणार आहे याचा सुध्दा विचार करणे अत्यावश्यक असते.

तुमची उदिष्ठ ठरवताना ती उदिष्ठ पुर्ण होण्यासाठी नियमीतपणे किती गुंतवणूक तुम्ही करु शकता याचा नीटपणे विचार करा. उदिष्ठपुर्तीचा कालावधी सुध्दा नीटपणे निश्र्चित करा.  यामुळे तु्म्ही तुमच्या गुंतवणूकीचे चांगल्याप्रकारे नियोजन करु शकाल.

काळ तुम्हाला अनुकूल आहे काय?
तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही किती काळ देऊ शकता? रोज काही तास कि महिन्यातील काही तास हेही महत्वाचे आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्हाल पैसे केव्हा लागणार आहेत यावरच गुंतवणूकीचा कोणता प्रकार तुम्ही निवडला पाहिजे हे अवलंबून असते. यासाठी गुंतवणूकीच्या विवीध प्रकारातून मागील काळात कसा परतावा मिळाला आहे हे तुम्ही तपासले पाहिजे. मिळणा-या परताव्यावर कर दायित्व आहे कि नाही याचाही विचार करणे महत्वाचे असते. जर का तुम्हाला पैसे १० वर्षानंतर किंवा त्यापेक्षा जास्त काळाने मिळून चालणार असतील तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. जर का तुम्हाला पुढील ते वर्षात पैसे लागणार असतील तर तुम्ही बॉण्ड फंडात गुंतवणूक करणे योग्य होईल. जर का तुम्हाला वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही अल्प मुदतीच्या बॉण्ड फंडात किंवा एफएमपीमध्ये गुंतवणूक करणे योग्य होईल. जर तुम्हाला वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही लिक्वीड फंडात किंवा बँक ठेवीत गुंतवणूक करणे योग्य होईल.

गुंतवणूकीचे नियोजन
एकदा का तुमचा गुंतवणूक सुरु करण्याचा निर्णय झाला कि प्रथमत: हे ठरवा कि तुम्ही किती पैशाची गुंतवणूक करु शकता. आता तुम्ही किती रक्कम प्रथमत: एकरकमी गुंतवू शकता ते पहा. यानंतर पुढे दरमहा नियमीत किती पैसे गुंतवणूकीसाठी बाजूला काढू शकता ते निश्चित करा. उत्पन्नाचे साधन कसे आहे, ते दरमहा ठरावीक आहे कि अनियमीत आहे हि गोष्ट सुध्दा तपासली पाहिजे. तुम्ही अचानक उभ्दवणा-या गरजेसाठी तरतुद केली आहे याची खात्री करा. एकदा का निर्णय झाला कि तुमच्या उदिष्ठाना पुर्ण करण्यासाठी तुमच्या गुंतवणूकीची सुरुवात करा व घेतलेल्या निर्णयाला चिकटून रहा. विचलीत होऊ नका.


४. शेअर बाजाराची प्राथमिक माहिती

प्रकरण ४ थे 
४. शेअर बाजाराची प्राथमिक माहिती
शेअर बाजाराचे कामकाज 
शेअर बाजारातून पैसे कसे मिळवता येऊ शकतात हे जर का तुम्हाला समजून घ्यावयाचे असेल तर तुम्हाला शेअर बाजाराचे कामकाज कशा प्रकारे चालते हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. शेअरबाजारात व्यवहार करण्यासाठी आजकाल तुमच्याकडे डिमँट खाते असणे गरजेचे असते, असे डिमँट खाते तुम्ही कोणत्याही ब्रोकरमार्फत उघडू शकता. शक्यतो नावाजलेल्या मोठा ब्रोकरमार्फत खाते उघडणे चांगले कारण फसवणूक होत नाही, काही छोट्या ब्रोकरनी यापूर्वी गुंतवणूकदरांचे शेअर्स परस्पर विकल्याच्या घटना घडलेल्या आहेत म्हणून तुमचे डिमँट खात्यातील शेअर्स आहेत कि नाहीत हे नियमितपणे तपासा.

आता ज्या व्यक्तीला शेअर्सची खरेदी किंवा विक्री बाजारात करावयाची असेल तर त्याला प्रथमत: ब्रोकरकडे ऑर्डर नोंदवणे गरजेचे असते. जेव्हा अशाप्रकारे शेअर्सच्या खरेदीची ऑर्डर ब्रोकरकडे नोंदवली जाते तेव्हा ब्रोकर त्याच्या सिस्टीमव्दारे ती संबधित एक्सचेंजकडे पाठवण्याचे काम करतो. त्यानंतर ती एक्सचेंजच्या सिस्टीममध्ये रांगेत (क्यू) उभी रहाते व त्यानंतर ती सिस्टीममध्ये लॉग झाल्यानंतर तिची सिस्टीममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणा-या शेअर्समधून खरेदीच्या व्यवहाराची पुर्तता केली जाते. अशाप्रकारे व्यवहार झाल्यानंतर ते शेअर्स ब्रोकरच्या मार्फत खरेदीदाराच्या डिमँट खात्यात वर्ग (जमा) केले जातात (किंवा पेपर रुपात खरेदीदाराला प्रत्यक्ष दिले जातात).

भारतीय शेअर बाजार एक धावती नजर
मुंबई (बॉंम्बे) स्टॉक एक्सचेंज (बीएसई) व नँशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हि दोन प्राथमीक एक्सचेंजेस् भारतात अस्तित्वात आहेत. या व्यतरिक्त २२ प्रादेशीक स्टॉक एक्सचेंजेस् कार्यरत आहेत. परंतु बीएसई व एनएसी हिच महत्वाची दोन एक्सचेंजेस् असून भारतातील ८०% व्यवहार हे या दोन एक्सचेंजेस् च्या माध्यमातून दर दिवशी केले जातात. दोन्ही एक्सचेंजेस् वर जवळपास सारख्यास संख्येत रोजच्या व्यवहारांची उलाढाल होत असते. सन १९९७-९८ मध्ये रोजची सरासरी उलाढाल रु.८५१ कोटी होती, ती २०१७-१८ सालात रु.४ लाख कोटी एवढी वाढली आहे.  एनएसी मध्ये २५०० पेक्षा जास्त कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.१२० लाख कोटी पेक्षा जास्त आहे. बीएसई मध्ये ५१३३ पेक्षा जास्त कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.१२५ लाख कोटी एवढे आहे. बहुतांशी प्रमुख कंपन्याचे शेअर्स हे दोन्ही स्टॉक एक्सचेंजीस् वर नोंदवलेले असल्यामुळे त्यांचे व्यवहार दोन्ही ठिकाणी केले जात असतात त्यामुळे गुंतवणूकदार दोन्ही पैकी कोणत्याही एका ठिकाणी त्याचे व्यवहार करु शकतो. दोन्ही एक्सचेंजीसची व्यवहार पुर्ततेचा कालावधी थोडा वेगवेगळा असल्यामुळे गुंतवणूकदार त्यांची पोझीशन शिफ्ट करु शकतो. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा प्राथमीक इंडेक्स बीएसई सेनेक्समध्ये ३० कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. तर एनएसई चा एस अँड पी एनएसई ५० इंडेक्स (निफ्टी) मध्ये पन्नास कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. बीएसई सेनेक्स हा एक जुना इंडेक्स असून तोच जास्तकरुन गुंतवणूकदारांमध्ये प्रचलीत आहे. दोन्ही कडील इंडेक्सचे अंश (indices) हे त्यामध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व कंपन्यांच्या मिळून एकत्रीत भांडवली मुल्यावर व रोजचे रोज प्रत्येक क्षणी गणले जातात. दर शनिवार व रविवारी शेअर बाजाराचे व्यवहार बंद असतात. दोन्हीकडे आता स्वयंचलीत पुर्णत: संगणकीकृत थेट (Online) व्यवहार केले जातात त्याला बोल्ट (BSE on  Line Trading) आणि नीट  (National Exchange Automated Trading) सिस्टीम म्हणून ओळखले जाते.  यामुळे अत्यंत प्रभावीपणे व वेगाने सर्व व्यवहार केले जातात ज्यामध्ये स्वयंचलीतपणे ऑर्डर जुळवली जाणे, व्यवहारांची वेगवान पुर्तता केली तर जातेच परंतु महत्वाचे म्हणजे या सर्व व्यवहारात पारदर्शकता ठेवली जाते. बीएसई वर ज्या शेअर्सचे व्यवहार केले जातात त्यांचे ‘A’, ‘B1’, ‘B2’ ‘C’ ‘F’ ‘Z’ या विभागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. यातील ‘A’ या विभागात असे शेअर्स असतात कि जे बदला (Carry Forward) मध्ये समाविष्ठ असतात. ‘F’ विभागात कर्जरोखे बाजाराचे निश्र्चित उत्पन्न साधनांची नोंद केली जाते (Debt Market - Fixed Income Securities) व यांचे व्यवहार केले जातात. ‘Z’ या विभागात काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्याचे शेअर्स असतात.  ‘C’ विभागात ‘A’, ‘B1’, ‘B2’ मधील ज्या सिक्युरिटीजचे ऑड लॉट मध्ये व्यवहार केले जातात अशा सिक्युरिटीजची नोंद केलेली असते. सर्व स्टॉक एक्सचे्जीस्, ब्रोकर (दलाल), डिपॉझीटरीजडिपॉझीटरी पार्टीसीपन्टस्, म्युच्युअल फंडस्, परदेशी अर्थसंस्था आणि अन्य सर्व सहभागीदार जे भारतातील प्राथमीक व दुय्यम भांडवली बाजारात सहभागी होतात त्या सर्वांवर सेबी (Securities and Exchange Board of India) या नियंत्रक संस्थेचे नियंत्रण असते.

रोलींग सिस्टीम सायकल
रोलींग सिस्टीममध्ये, व्यवहाराचा प्रत्येक दिवस हा व्यवहाराचा काळ समजला जातो आणि अशा दिवसात केलेले सर्व व्यवहार हे त्या दिवसाचे निव्वळ देयक (Net obligation) समजून त्या व्यवहारांची पुर्तता केली जाते. एनएसई व बीएसई वर रोलींग सिस्टीममध्ये व्यवहार टी+२ या सुत्रानुसार म्हणजेच व्यवहाराच्या दुस-या दिवशी पुरे केले जातात. पुर्तता दिवस निश्र्चित करण्यासाठी सर्व शनिवार, रविवार, सुट्ट्यांचे दिवस ज्यामध्ये बँक हॉलीडेज, एक्सचेंज हॉलीडेज इ. वगळले जातात. उदा. मंगळवारच्या व्यवहारांची पुर्तता बुधवारी व शुक्रवारच्या व्यवहारांची पुर्तता सोमवारी केली जाते.

खरेदीची मर्यादा
समजा तुम्ही काही शेअर्स एनएसई वर विकले आहात आणि त्याचे पैसे जर तुम्हाला दुस-या सेटमेंट सायकलमध्ये वापरून परत एनएसई अथवा बीएसई वर शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरावयाचे असतील तर त्यासाठी तुमचा ब्रोकर तुम्हाला खरेदीची काही मर्यादा वापरण्यास देतो तिलाच खरेदीची मर्यादा म्हणतात. समजा तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे रु.५००००/- तुमच्या बँक खात्याव्दारा जमा केले आहात तर ब्रोकर तुम्हाला तेवढ्याच रकमेच्या किंमतीएवढे शेअर्स खरेदी करण्याची परवानगी देईल. आता समजा सोमवारी तुम्ही रु.१,००,०००/- किंमतीचे शेअर्स विकलेत तर त्या क्षणापासून तुम्ही रु.१,५०,०००/- पर्यंतचे शेअर्स एनएसई किंवा बीएसई वर खरेदी करु शकता. आता मंगळवारी तुम्ही रु.७५,०००/- चे शेअर्स खरेदी केलेत तर शिल्लक मर्यादा राहील रु.७५,००००/- ची. म्हणजेच थोडक्यात खरेदी मर्यादा म्हणजे तुम्ही ब्रोकरकडे जमा केलेली रक्कम अधीक तुम्ही विकलेल्या शेअर्सची किंमत.

डिमटेरिअलाझेशन म्हणजे काय?
डिमटेरिअलाझेशन म्हणजेच डिमँट ज्यामध्ये गुंतवणूकदार त्याच्याकडे असणारे प्रत्यक्ष सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्स, डिपॉझीटरी पार्टिसिपण्टकडे इलेक्टॉनीक स्वरुपात ठेवल्या जाणा-या प्रणालीत बदली करुन घेऊ शकतो. गुंतवणूकदार त्याच्या नांवावर असणा-या सिक्युरिटीज सर्टिफिकेट ज्या डिपॉझीटरी पार्टिसिपण्टकडे डिमटेरिअलाझेशन साठी पुर्वी नोंदवलेल्या असतात त्याच फक्त डिमँट करु शकतो.

डिपॉझीटरी
अशी एक संस्था जी गुंतवणूकदारांच्या सिक्युरिटीज इलेक्टॉनीक स्वरुपात सांभाळून ठेवीत असते तिला डिपॉझीटरी म्हणून संबोधीले जाते. म्हणूनच हिला सिक्युरिटीज बँक असेही म्हणता येईल. भारतात एनएसडिएल व सिडीएसएल अशा दोन संस्था हे काम करतात. डिपॉझीटरी प्रणाली हि बँकेप्रमाणेच काम करते फरक एवढाच असतो कि बँक तुमचे पैसे हाताळते तर डिपॉझीटरीज् तुमच्या शेअर्स व अन्य भांडवली सिक्युरिटीज हाताळत असते. जो गुंतवणूकदार या संस्थाच्या सेवेचा वापर करुन घेऊ इच्छितो त्याला या संस्थेकडे एक खाते डिपॉझीटरी पार्टीसिपंटचे मार्फत उघडावे लागते, हेच डिमँट खाते.

डिपॉझीटरी पार्टीसीपंट (डिपी)
भांडवली बाजारातील मध्यस्त ज्याच्यामार्फत गुंतवणूकदाराला डिपॉझीटरी सर्व्हिसेस घेता येतात त्याला डिपॉझीटरी पार्टीसीपंट म्हणतात. सेबीच्या नियमानुसार डिपी म्हणजे अशी संस्था जी आर्थीक सेवा देते उदा. बँक, ब्रोकर्स, कस्टोडिअनस्, इ. या डिपींच्या वितरण व्यवस्थापनाच्या माध्यमातून डिपॉझीटरीला संपुर्ण देशभर विखुरलेल्या गुंतवणूकदारांपर्यत कमी खर्चात पोहोचण्याची सुवीधा मिळते. डिपीची नियुक्ती हि अनेक बाबींची पुर्तता व सेबीच्या मान्यतेनंतर डिपॉझीटरी करत असते. यासाठी कठोर नियमाली असते. या व्यवसायाची व्याप्ती विचारात घेऊनच अनेक बँका, आर्थीक संस्था, ब्रोकर्स हे डिपी म्हणून संपुर्ण देशभर काम करत आहेत.

डिपॉझीटरी प्रणालीचे फायदे
डिमँट मधून केलेल्या व्यवहारांमुळे होणारे फायदे:
१)      वाईट व्यवहाराना पुर्णत: पायबंद बसतो.
२)      शेअर ट्रान्सफरच्या वेळी 0.5% स्टँप ड्युटीची बचत.
३)      कुरिअर/पोस्टेजचा खर्च नाही.
४)      ड्युप्लीकेट सर्टिफिकेटसाठी ब्रोकरबरोबर पाठपुरावा करण्याची गरज नाही.
५)      सर्टिफकेट हरवण्याचा धोका नाही.
६)      तत्काळ ट्रान्सफर होत असल्यामुळे तरलता सुलभ.
७)      कमी दलाली खर्च.
८)      बोनस व राईट शेअर्स डिमँट खात्यात विनाविलंब जमा होतात.
९)      डिमँट स्वरुपातील शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेतल्यास कमी व्याज दराचा फायदा मिळतो.
१०)   जास्त कर्ज मिळते, किंमतीच्या ७५% पर्यंत विनासायास.

डिमँट खाते कसे उघडावे
बँकेत बचत खाते सुरु करण्याइतकेच डिमँट खाते उघडने सोपे व सुलभ आहे. तुम्ही कोणत्याही डिपी बरोबर खाते काढू शकता.
१)      तुमच्या आवडीच्या डिपीकडे असणारा फॉर्म भरा, फोटो चिकटवा, सह्या करा.
२)      डिपी बरोबरच्या करारपत्रावर, ते वाचून नंतर सह्या करा.
३)      पँन कार्ड, रहाण्याचा पुरावा, बँक खाते पुरावा, फिचा चेक इ. कागदपत्रांच्या छायांकीत प्रती स्वसाक्षांकीत जोडा.
४)      डिपीकडे वरीलप्रमाणे सर्व कागदपत्र जमा करा.
५)      डिपी तुम्हाला ग्राहक खाते क्रमांक व डिपी आयडी प्रदान करेल ज्याची नोंद डिपॉझीटरीकडे असेल.
६)      तुम्ही कितीही डिमँट खाती उघडू शकता.
७)      जर तुमच्याकडे सर्टि. स्वरुपात जॉईंट नांवाने शेअर्स असतील तर त्यावर ज्या क्रमाने नांवे असतील त्याच क्रमाने डिमँट खाते उघडणे श्रेयस्कर होते.
तुमच्याकडील सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्स डिमँट कसे करावेत?
डिमटेरिअलायझेशनचा फॉर्म भरा. सोबत शेअर सर्टिफिकेटवर (Surrendered for Demat) असे लहून सोबत जोडा. १५ दिवसात तुमच्या खात्यात शेअर्स जमा होतील.
याचप्रमाणे एका डिमँट मधील शेअर्स दुस-या डिमँट मध्ये वर्ग करता येतात.

डिमँट खात्यातून व्यवहार करणे
सेबीने ७६१ कंपन्याचे शेअर्सचा व्यवहार हा डिमँटमधूनच करणे बंधनकारक केलेले आहे.

शॉर्ट सेलींग 
जर तुमच्या खात्यात शेअर्स नसतानाही जर तुम्ही शेअर्सची विक्री केली तर अशा व्यवहाराला शॉर्ट सेलींग असे म्हणतात. जेव्हा एखाद्या ट्रेडला वाटते कि एक विशिष्ठ शेअरची किंमत त्या दिवशी कमी होणार आहे तर तो असे करतो, मात्र  अशा व्यवहाराची पुर्तता त्याच दिवशी बाजार बंद होण्यापुर्वी करावी लागते (काही डिपी ते स्वयंचलीत प्रणालीचा वापर करुन करतात तर काही करत नाहीत मात्र नंतर अश्या व्यवहारांचा लिलाव ते करतात व ज्यात १००% तुमचे प्रचंड नुकसान होते).
मी स्वत: असे व्यवहार कधीच करत नाही व तुम्ही सुध्दा हे करण्यात फारच जोखीम असते हे लक्षात ठेवावे. हा एक डे ट्रेडिंगमधला व्यवहार असून यात ९५% पेक्षा जास्त लोकांचे नुकसानच होते. तुमचा निर्णय तुम्ही घ्या.

मार्जीन ट्रेडिंग 
वस्तुत: शेअर खरेदी करण्यासाठी तुमच्या डिमँट खात्यात पैसे शिल्लक हवेत व विक्री करण्यासाठी शेअर्स जमा हवेत. मात्र बहुतांशी ब्रोकर (डिपी) तुमच्या डिमँट खात्यात असणा-या शेअर्स अथवा रोख जमा रकमेच्या अगदी १० पटीपर्यंत किंमतीचे व्यवहार करण्याची मुभा देतात. उदा. तुमच्या खात्यात रु.एक लाख जमा आहेत तर ब्रोकर तुम्हाला १० लाख रु. किंमतीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याची मुभा देतो. समजा अ कंपनीच्या शेअरचा भाव रु.१०००० आहे तर रु.एक लाखात तुम्ही १० शेअर्स घेऊ शकता, मात्र ब्रोकर तुम्हाला ते १०० घेण्याची परवानगी देतो. जर नंतर भाव त्याच दिवशी रु.११००० झाला तर तुम्हाला एका दिवसात तुमच्या एक लाखावर एक लाख रु. फायदा होतो, तेच भाव ९००० झाला तर संपुर्ण एक लाख रुपये नुकसान होते. या सुविधेलाच मार्जीन ट्रेडिंग असे म्हणतात.
मी हि सुवीधा वापरत नाही. यात फारच मोठा धोका असतो. ९५% पेंक्षा जास्त लोकांचे अशा व्यवहारात (एकूणच डे ट्रेडिंग मध्ये) नुकसानच होते. तुमचा निर्णय तुम्ही घ्या.

अमेरिकन शेअर बाजारात ह्या प्रकाराला परवानगीच नाही.

ऑर्डरचे प्रकार
लिमीट ऑर्डर: एक दराची मर्यादा घालून प्लेस केलेली ऑर्डर. समजा रिलायन्सच्या शेअरची आस्क किंमत रु. १०१०, परंतु तुम्हाला तो रु.१००० ला घेणे योग्य वाटत असेल तर तुम्ही रु.१००० च्या दराने लिमीट ऑर्डर नोंदवू शकता. जर त्या शेअरची किंमत १००० किंवा त्यापेक्षा कमी झाली तरच तुमच्या ऑर्डरची पुर्तता होऊन शेअर्स तुमच्या खात्यात जमा होतील. समजा त्या दिवशी रिलायन्सची किंमत रु.९० झाली व त्यावेळी जर आस्क किंमत रु.९४ असेल तर तुमच्या खात्यात ९४ च्या दराने शेअर्स जमा होतील. याचप्रकारे तुम्ही विक्रीसाठीसुध्दा लिमीट ऑर्डर नोंदवू शकता. उदा. तुमच्याकडे ९४ ने खरेदी केलेला रिलायन्सचे शेअर्स आहेत व तुम्हाला वाटते जर रु.१०१२ किंमत मिळाली तर तो विकावा, तर तुम्ही रु.१०१२ च्या लिमीट ऑर्डर नोंदवा, दर १०१२ किंवा अधीक झाला तर व्यवहार पुर्तता होईल. यालाच लिमीट ऑर्डर म्हणतात.

मार्केट ऑर्डर: त्या क्षणी असणा-या दराने दिलेली खरेदी-विक्रीची ऑर्डर. अशा वेळी ऑर्डर पुर्ततेच्या क्षणी असणा-या दराने ऑर्डरची पुर्तता केली जाते. मग ती कमी अथवा जास्तसुध्दा होऊ शकते.
स्टॉप लॉस ऑर्डर: यालाच ट्रिगर प्राईज ऑर्डर असेही म्हणातात, याचा उपयोग संभाव्य नुकसान मर्यादित करण्यासाठी केला जातो. याचा वापर अत्यंत हुशारीने करावा.

सर्किट फिल्टर व ट्रेडिंग बँडस्
बाजारातील चढ उतारावर (अस्थीरतेवर) मर्यादा असावी म्हणून सेबीने काही नियम केलेले आहेत व किंमतीनुसार दिवसातील कमाल व किमान दरातील फरक ठरविलेला आहे. त्यानुसार ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.१० ते रु.२० च्या दरम्याने आहे त्यांची किंमत दिवसात २५% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.१० पेक्षा आहे त्यांची किंमत दिवसात ५०% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.२० पेक्षा जास्त आहे त्यांची किंमत दिवसात ८% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. मात्र १०० निवडक शेअर्सचे बाबत ८% च्या नियम ८% व एक तासानंतर परत ८% असा शिथील केलेला आहे. या गणणेसाठी आदल्या दिवसाचा बंद भाव आधारभूत ठेवलेला आहे. एनएसई व बीएसई वरील बंद भाव वेगवेगळा असू शकतो म्हणून दोन्हीकडचे सर्किटही वेगळे असू शकते.

बदला
बदला म्हणजे कशाच्यातरी बदल्यात सौदे पुढे चालू ठेवणे (Carry Forward). बदला हि एक प्रकारची सौदे पुढे चालू ठेवण्यासाठी दिलेली फि (आकार) असते. हे एक हेजींगचे माध्यम आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार प्रत्यक्ष शेअर्सचा ताबा न घेता त्या शेअर्समध्ये आपला सहभाग (Position) चालू ठेवू शकतो. या साठी त्याला थोडी फि द्यावी लागते. हे झाले शेअर्सच्या खरेदीबाबत पण तेच जर का त्याला शेअर्सचे शॉर्ट सेलींग करावयाचे असेल तर त्यासाठी द्याव्या लागणा-या फिला उंधा बदला असे म्हणतात. या बदला प्रकारामुळे ३ प्रकारच्या गरजा भागवल्या जातात:

१)      क्वसी हेजींग: जर गुंतवणूकदाराला वाटत असेल कि एखाद्या शेअरची किंमत पुढील काही काळात वाढणार/घटणार आहे, तर अशा वेळी शेअर्स प्रत्यक्षात न घेता/देता तो या पद्धतीने व्यवहार करून  अस्थीर बाजारात सहभागी होऊ शकतो.

२)      शेअर गहाणवट (Stock Lending): जर त्याला प्रत्यक्ष विक्रीसाठी शेअर्स नसतानासुध्दा शॉर्ट सेलींग करावयाचे असेल तर त्यासाठी काही आकार घेऊन हे करण्यास तयार असणारे शेअर्स सावकार (स्टॉक एक्सचेंजच्या मार्फतच) त्याला हि सुवीधा उपलब्ध करुन देतात.

३)      कर्ज व्यवहार (Financing Mechanism) : जर तुम्हाला शेअर्सची पुर्ण किंमत दिल्याशिवाय ते खरेदी करावयाचे असतील तर शेअर्स सावकार (स्टॉक एक्सचेंजच्या मार्फतच) त्याला यासाठी पैसे काही आकार (व्याज) घेऊन पुरवतात. या व्यवहाराला व्याज बदलाकिंवा बदलाम्हणतात.

हा व्यवहार समजून घेण्यासाठी आपण एक उदाहण पाहूया. क्ष या व्यक्तीने इंफोसीसचे १००० शेअर्स खरेदी केलेले आहेत मात्र त्याचा ताबा घेण्यासाठी त्याला त्याची पुर्ण किंमत देणे आवश्यक आहे परंतु क्ष कडे तेवढे पैसे खात्यात शिल्लक नाहित, अशावेळी तो शेअर बाजारात उपलब्ध असलेल्या बदलाव्यवस्थेची सुवीधा वापरु शकतो. आता काय होते कि जी व्यक्ती क्ष ला बदला व्यवस्थेतून हा खरेदीचा व्यवहार पुर्ण करण्यासाठी पैसे देण्यास तयार असते ती व्यक्ती क्षच्या वतीने ते शेअर्स खरेदी करते आणि क्ष ला त्याने कर्जाऊ घेतलेल्या रकमेवर फक्त व्याज द्यावे लागते. याच्या उलट जर का क्ष कडे शेअर नसतानासुध्दा त्याने विक्री केलेली असेल तर त्याच्याकडे दुस-याला डिलेव्हरी देण्यासाठी शेअर्स नसतात म्हणून स्टॉक एक्सचेंज मार्फत तो ज्याच्याकडे शेअर्स असतात अश्या व्यक्तीकडून ते उधार घेतो व त्यासाठी त्याला व्याज (बदला) द्यावा लागतो. गुंतवणूकदार म्हणून तुम्ही बदला सेवा घेऊ किंवा देऊ शकता. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही हि सेवा व्याज भरुन घेता व जर तुमच्य़ाकडे पैसे किंवा शेअर्स असतील तर व्याज (बदला) घेऊन हे सेवा तुम्ही स्टॉक एक्सचेंज मार्फत दुस-याला देऊ शकता. दर शनिवारी बीएसई मध्ये बदला व्यवस्थेसाठी एक सत्र चालते ज्यात या व्यवहारात ज्या शेअर्स/सिक्युरिटिजचे पोटी उधार व्यवहार असतात त्यांची यादी तयार केली जाते. बाजारात उपलब्ध असणा-या रोखतेवर व्याजाचे (बदल्याचे) दर ठरतात. जेव्हा बाजारात जास्त खरेदी होते तेव्हा बदला दर जास्त असतो व जेव्हा बाजारात विक्री जास्त होते तेव्हा बदला दर कमी असतो. बदला व्यवहारांसाठी फक्त ‘A’ विभागातील शेअर्स, ज्यांचा डिव्हीडंड जास्त व नियमीत मिळण्याचा पुर्वेतिहास आहे, ज्याना उच्च तरलता (Liquidity) असते, ज्यांची रोजच मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असेच ए गृपमधील शेअर्स विचारात घेतले जातात. गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळावा म्हणुन या व्यवहारांसाठी कोणते शेअर्स ग्राह्य धरले जातील हे अगोदर जाहिर केले जात नाही. या प्रकारातील सौदे पुर्ण केले जाण्याची खात्री असते व त्यासाठी ट्रेड गँरण्टी फंड ऑफ बीएसई हा निर्माण केलेला आहे, त्यामुळे अशा व्यवहारात सौदा पुर्तीची जवळपास जोखीम नसते, फक्त जर का तुमचा ब्रोकरने दिवाळखोरी जाहिर केली तरच जोखीम येऊ शकते ज्याची शक्यता जवळपास नसते. आणि जरी ब्रोकरने दिवाळखोरी जाहिर केली तरी शेअर्स तुमच्याच मालकीचे असतात ते तुम्ही केव्हाही विकू शकता, फक्त बाजाराच्या अस्थिरतेची अशा वेळी जोखीम राहिल.

सिक्युरिटी लेंडिंग
हि व्यवस्था एनएसईची असून हि बीएसईच्या बदल्याप्रमाणेच काम करते फक्त यात सौदे पुढे चालू ठेवण्याची मुभा नसते.

इनसायडर ट्रेडिंग
भारतात इनसायडर ट्रेडिंगवर बंदी आहे. जी माहिती संवेदनशील आहे व ज्यामुळे शेअरच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो व ती माहिती, माहितीच्या नियमीत स्त्रोतापेक्षा अन्य ठिकाणापेक्षा (कंपनीच्या अंतर्गत) मिळवून स्वत:च्या फायद्यासाठी कंपनीच्या पदाधीका-यानी वापरुन त्या माहितीचा उपयोग करुन शेअर ट्रेडिंग करणे याला बंदी आहे. या बाबत सेबीचे कायदे अत्यंत कडक आहेत. या बाबत अधीक माहिती सेबीच्या http://www.sebi.gov.in/  साईटवर आहे.